नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतार समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केले. त्यांनी याआधी प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून मंडळाला प्रत्यक्ष भेट दिली व समाजभवन बांधकामाची प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. मंडळ कार्यकारिणीने भवनाचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले. याबाबत त्यांना माहिती देण्यात आली व पुढील बांधकामाकरिता मदतीची विनंती करण्यात आली.
गडकरींनी समाजबांधवांना मदतीचे आश्वासन दिले होते. सुतार समाजबांधवांना त्यांनी नूतनवर्षामध्ये अविस्मरणीय अशी भेट देऊन खासदार निधीतून तब्बल २५ लाख रुपये भवनाच्या बांधकामास देऊन बांधकामाचा मार्ग सुकर केला. मंडळ कार्यकारिणीने घेतलेल्या बैठकीमध्ये गडकरी यांचे आभार मानले. आमदार सुधाकर कोहळे, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक धोटे, सामाजिक कार्यकर्ते बेनिराम वरणकर, मंडळाचे माजी सचिव पांडुरंग राऊत यांनी केलेल्या सहकार्यामुळेच निधी प्राप्त होऊ शकला. त्यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यासाठी त्यांचेही आभार मानले.
मंडळ कार्यकारिणीचे अध्यक्ष विष्णुपंत मोरेकर, उपाध्यक्ष अशोक पातूरकर, सचिव रमाकांत वरूडकर, सदस्य पांडुरंग येलकर यांनी निधी मिळविण्यासंदर्भात सतत पाठपुरावा केला ही त्याचीच फलश्रुती आहे. कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी सदस्य सुरेंद्र निलटकर, मनोज आकोटकर, लता वझेकर, विद्या राऊत, चित्रा नानोटकर, कल्पना आसाटकर, रमेश लुढेकर, विष्णू लोणकर, नानाभाऊ बाळापुरे यांचेही सहकार्य लाभले.