गोवारींना मिळणार गोंडगोवारींचे जात प्रमाणपत्र, जिल्हाधिकारी नवाल यांचे आदेश

तृतीयपंथी
February 23, 2019
अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – गोवारींना गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर अमरावती जिल्ह्यात या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्गमित केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २५ जानेवारी रोजी आदेश पारित करून गोवारीना गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देशित केले होते. त्याचप्रमाणे आदिवासी विभागाचे अवर सचिव र. तू. जाधव यांनी शासकीय पत्रक काढून या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना निर्गमित केल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाचे अध्यक्ष नंदू सहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली होती.

तर आदिम गोवारी विकास मंडळाचे मारोतराव वाघाडे, भाऊराव चौधरी, पुंडलिक चामलोट यांनी निवेदन दिले होते. न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने गोवारींना गोंडगोवारीचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.