आग्रा : वृत्तसंस्था – अनेकदा सोशल मीडियावर काहींची मैत्री होते. नंतर संपर्क वाढतो. पण बऱ्याच जणांची यात फसवणूक केली जाते. असाच एका प्रकार उत्तर प्रदेशामधील आग्रा येथे घडला आहे. एका तरुणीची इंस्टाग्रामवर एका तरुणाशी मैत्री झाली. त्यानंतर ते एका हॉटेलमध्ये भेटले. आणि तरुणाने पीडितेला दारू पाजली. तसेच ती नशेत असताना तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीचे वय २० वर्षे असून तरुण आग्रा येथे खासगी संस्थेत डिप्लोमा कोर्स करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाबद्दल आग्राचे एसएसपी बबलू कुमार यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपीची आणि पीडितेची एका महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली. नंतर त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन दोघांमध्ये गप्पाही सुरु झाल्या. त्यांनतर त्यांनी भेटायचे ठरवले.
आरोपीने तरुणीला आग्रा येथील एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीचे नाव दर्श गौतम असून त्याचे वय २३ वर्षे आहे, असे पोलिसांनी सांगितले. दारूच्या नशेत असताना बलात्कार करून आरोपी पळून गेला. त्याच्या एका तासानंतर तरुणीला जाग आल्यावर तिला प्रायव्हेट पार्टवर जखमा झाल्याचे आढळून आले आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार कळाला. तिने लगेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनीही हॉटेलमधील आणि बाजूच्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपीचा शोध सुरु केला. नंतर अलिगढ येथे आरोपीला मित्रांसोबत लग्नाला जाताना अटक करण्यात आले, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी आरोपीसह तीन मित्र आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असता पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बलात्कारापूर्वी तरुणीने व्होडका पिल्याचेही स्पष्ट झाले आहे.