जयपुर : वृत्तसंस्था- राजस्थान पोलिसांनी पॉर्न साईट बंद करण्याची मोहिम सुरू केली आहे. पोलिसांनी अशा 25 साईट बंद केल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या साईट बंद केल्यानंतर ती चालवणारे दुसर्या नावाने ती सुरू करत आहेत. अशा सुमारे 50 साईट सुरू झाल्या आहेत. पॉर्न साईटविरूद्ध कारवाईसाठी पोलीस संचालक भूपेन्द्र सिंह यांनी आदेश दिले आहेत. स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) चे एडीजी अनिल पालीवाल यांनी सांगितले की, सायबर टीमने सुमारे 210 अश्लील लिंकसुद्धा बंद केल्या आहेत. इंटरनेट सेवा देणार्या कंपनीद्वारे पॉर्न साईट बंद केल्या जात आहेत. यादरम्यान लागोपाठ नव्या साईट सुरू होत असल्याची माहितीही समोर येत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे सुद्धा शक्य आहे की, पॉर्न साईटला इंटरनेटवर प्रवेश मिळताच बंद करता येईल. बहुतांश पॉर्न साईट परदेशातून चालवण्यात येतात. त्यांचे सर्वर परदेशात असल्याने नियंत्रण ठेवणे अवघड आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची मदत घेण्यात येत आहे.
अश्लील व्हिडिओ सापडल्यास दाखल होणार गुन्हा
पॉर्न साईट बंद करण्यासोबतच पोलीस आता त्या बघणार्यांवर सुद्धा कारवाई करत आहेत. आता कोणाच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. एसओजी अधिकार्यांनी सांगितले की, अश्लील व्हिडियो सापडल्यास मोबाईल धारकाविरूद्ध आयटी अॅक्टच्या कलम 67 बी, पोक्सो अॅक्ट व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. गुन्हा दाखल करून मोबाईलसुद्धा जप्त करण्यात येईल.
चमत्कारी औषध असल्याचे सांगून फसवणूक, 14 अटकेत
तर दुसरीकडे जयपुर पोलिसांनी चमत्कारी औषधाच्या नावाने जडी-बूटी विकून फसवणार्यांविरूद्ध मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत 25 ठिकाणी छापे टाकून 14 लोकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून मोठ्याप्रमाणात जडी बुटी जप्त करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुमार गुप्ता यांनी सांगितले की, आरोपी रस्त्याच्या कडेला तंबू टाकून आकर्षक जाहीरात करून लोकांना थांबवत होते. नंतर त्यांना साधी जडी बुटी दाखवून चमत्कारी जडी बुटी असल्याचे सांगत होते. लैंगिक समस्या दूर करण्यासाठी हे औषध उपयुक्त असल्याचे सांगून फसवत होते. आरोपींजवळ अश्वगंधा, मीत गिलोय, बदाम, बालम, खीरा, घाटोरिया, अर्जुन साल, सेम्बल, त्रिफळा पावडर, लाजवंती व अन्य साहित्य मिळाले आहे.