पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कमवा आणि शिका या योजनेत विद्यापीठाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. योजनेत काम न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावे पैसे घेऊन विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकऱणी तीन समन्वयकांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी योजनेत काम न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे घेऊन विद्यापीठीची फसवणूक केली.
अमोल भनुदास मगर (रा. मारवाड, ता. माळशिरस), सागर तानाजी काळे (रा. पळसदेव, ता. इंदापूर ) आणि किरण गायकवाड (रा. मुढाळे, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर विद्यार्थी विकास महामंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई (वय ४३, रा. शिक्षक निवास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेले तिघेही कमवा व शिका योजनेतील समन्वयक आहेत. या तिघांनी कमवा व शिका योजनेत जे विद्यार्थी या योजनेत काम करत नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे उकळले. योजनेचे पैसे बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करून ते पैसे त्यांच्याकडून रोख स्वरुपात घेतले. सावित्रीबाई फुले विद्यापीठाची अशा प्रकारे ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप तरी कोणालाही अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस.डी. दराडे करीत आहेत.