परभणी : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे पाथरीचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलगा पृथ्वीराज फड याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. उड्डाणपुलावर त्याच्या दुचाकीला अपघात झाल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पृथ्वीराज फड हा मुंबईत शिक्षण घेत होता. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराजा मुंबईहून परभणीला आला होता. तो आपल्या डुकाटी स्क्रम्बलर बाइकवरून गंगाखेड रस्त्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी उड्डाणपुलावर जात असताना त्याच्या बाइकला अपघात झाला. त्यांचा नेमका अपघात कशामुळे झाला हे समजू शकले नाही. अपघात इतका भीषण होता की, महागडी असलेली डुकाटी स्क्रम्बलर बाइकचा समोरचा भाग चक्काचूर झाला. धडक इतकी जोरात होती की, बाइकचे हँडल सुद्धा तुटले होते. घटनास्थळी पृथ्वीराजचे हेल्मेटसुद्धा इतर ठिकाणी पडल्याचे आढळून आले.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन पृथ्वीराजला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पृथ्वीराजला तपासून मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच फड कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. लॉकडाउनच्या काळात घरी आलेल्या पृथ्वीराजच्या अपघाती निधनामुळे फड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मोहन फड पाथरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असून, 2014 साली ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते भाजपच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.