नागपूर बहुजननामा ऑनलाईन – जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन थायलंडची राजधानी बँकॉक येथे घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या २ व ३ तारखेला हे संमेलन बँकॉक येथे पार पडणार आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे विदेशात साहित्य संमेलन पार पडत आहे.
या साहित्य संमेलनात इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करणाऱ्या ग्रंथाचे आणि तिन्ही भाषांतील संपादित कवितासंग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. तसेच जगभरातील साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, सिनेकलाकार या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार आहेत.
या संमेलनात सहभागी होणाऱ्यांना ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान थायलंडमधील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, म्यूझीयम, कलादालन, विविध पर्यटनस्थळे, बौद्ध सांस्कृतिक केंद्र इत्यादी पाहण्याची संधी मिळणार आहे. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ३० जूलैपर्यंत महामंडळाचे सरचिटणीस सुजीत मुरमाडे आणि कार्याध्यक्ष रविंद्र तिरपुडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याची अधिक माहिती प्लॉट नं. ४०, महापुष्प सोसायटी, बेलतरोडी रोड, लोहार समाज भवनाच्या मागे, नागपूर-२७ येथे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.