यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – व्यावसायिकाच्या १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी १० तासात या प्रकाराचा उलगडा करत भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यास ह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. क्रिकेट सट्ट्यामध्ये हरल्यामुळे त्याने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे तपासात समोर आले आहे.
शुभम तोलवानी असे अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासोबत इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्याचा मास्टरमाईंड शुभम असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
भरदिवसा चाकूच्या धाकाने अपहरण
यवतमाळ येथील व्यावसायिक ईश्वर नाचवाणी यांचा १८ वर्षीय मुलगा हर्ष याचे शिवाजी गार्डन परिसरातून भरदिवसा चाकूचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली होती. गुन्हेगाराला अटक करून मुलाची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
दरम्यान अपहरणकर्त्यांनी हर्ष नचवाणी याचे अपहरण करून त्याला जंगलात नेले. त्याठिकाणी त्याला मारहाण करून ईश्वर नचवाणी यांना व्हिडीओ कॉल करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. तासाभरात रक्कम मिळाली नाही तर मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. घाबरलेल्या ईश्वर नचवाणी यांनी पोलिसांकडे धाव घेत सर्व हकीकत सांगितले. पोलीस अधीक्षकांनी घटनेचे गांभीर्य़ लक्षात घेऊन पोलिसांना मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी यवतमाळ एमआयडीसी परिसरात असलेल्या जंगलासह अनेक ठिकाणी तपासणी करून आरोपींना बेड्या ठोकल्या. क्रिकेट सट्ट्यामध्ये पैसे हरल्याने केले अपहरण क्रिकेट सट्ट्यामध्ये पैसे हरल्याने साथीदारांच्या मदतीने हर्षच्या अपहरणाचा डाव रचल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून अपहरण झालेल्या हर्षची सुखरूप सुटका केली.