बहुजननामा ऑनलाईन टीम : सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचे काम जोमात असल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची नाव उघड करु नयेत असे प्रशासनाचे आदेश आहेत. असे असतानाही आदेश धाब्यावर बसवून रुग्णांची नाव उघड केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपाध्यक्ष संजीव पाखरे यांच्यावर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विलगिकरण कक्षात उपचार घेत असलेले तीन रुग्ण तिथून कोणालाही न सांगता निघून गेले होते. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या नावासह सरकारी कामासाठी एक पत्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, हे तिघेही पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तोवर त्यांच्या नावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या प्रकरणी रुग्णालयाच्या एका कर्मचार्याने फिर्याद दिली आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, सायबर सेलने केलेल्या तपासात पुण्यातील मनसेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे यांनी ही नावे व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार, पाखरे यांच्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.