नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसची भीती सतत वाढत असून सोबतच या व्हायरसने संक्रमित असलेल्या प्रकरणांची वाढ होत आहे. या दरम्यान देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. देशात या व्हायरसने संक्रमितांचा आकडा १५१ वर गेला आहे. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या एका संक्रमित रुग्णाने आत्महत्या केली आहे.
रुग्णाने सातव्या मजल्यावरून उडी मारत आपला जीव दिला असून या रुग्णाचे वय ३५ वर्ष होते आणि तो थोड्याच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतून परतला होता. माहितीनुसार, व्हायरसने पीडित असलेला संशयित मागचे एक वर्ष सिडनीत राहिला होता. नोडल अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्ण बुधवारी संध्याकाळी नऊ वाजता आयजीआय हवाई अड्ड्यावरून कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून रुग्णालयात भरती केले गेले होते. त्याला डोकेदुखीचा त्रासही होत होता.
देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढून १५१ वर
लेहमध्ये सैन्याचा एक ३४ वर्षीय जवान कोरोना व्हायरसने संक्रमित सापडला असून त्यानंतर सैन्याने पाळत ठेवत आपले युद्धाअभ्यास आणि प्रशिक्षण पुढे ढकलले आहे. कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या बुधवारी वाढत १५१ वर गेली आहे. यादरम्यान, लोकसभेत एक लिखित स्वरूपात उत्तर देत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, परराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण भारतीयांची संख्या २७६ आहे. त्यात इराणमध्ये २५५, युएईमध्ये १२, इटलीमध्ये ५, हाँगकाँग, कुवेत, रवांडा श्रीलंकेत १-१ प्रकरण सापडले आहे.