मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेच्या उलाढालीत आता महत्वाची बातमी समोर येत आहे, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्च राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप पक्षावर नाराज असलेले खडसे लवकरच महाआघाडीच्या सरकारमध्ये प्रवेश करणार असून खडसेंना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, भाजप पक्षाने विधानसभा निवडणुकी वेळीही एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यावेळीही एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकानीं नाराजी व्यक्त केली होती. त्यात, काल एकनाथ खडसेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊतांनीही खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात असतात, असं विधान केल्यानं खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र सरकार कोसळल्यानंतर एकनाथ खडसेंनी काल पक्षाला घरचा आहेर दिला होता. विधानसभा निवडणुकीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापून आयारामांना संधी देण्यात आली, त्यामुळे जागा घातल्या, त्यामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर २५ जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकल्याचंही खडसेंनी सांगितलं होतं.
तर विधानसभा निवडणुकी वेळी एकनाथ खडसे यांना भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं, तसेच त्यांच्या कन्येला मुक्ताईनगरमधून तिकीट दिल्यानंतरही राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटलांनी तिचा पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये नाराज असून खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. एकनाथ खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत, असे शरद पवारांनी त्यावेळी म्हटलं होतं. भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे खरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार का ? अशी चर्चा तेव्हा रंगली होती. मात्र राष्ट्रवादीत करणार ते वृत्त त्यांनी फेटाळून लावलं होतं. तसेच पक्षाच्या आदेशानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गेले ३० वर्षे तुम्ही मला निवडून देताय. मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचेही खडसे म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादी सोबत तीन महिनेच काय तर तीन वर्षांपासून संपर्कात राहिलेलो नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे त्यावेळी दिलं होते. परंतु आता खडसेंच्या या वक्तव्यांमुळे शिवसेनेत जाणार कि, राष्ट्रवादीत प्रवेश करणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.
Visit : bahujannama.com