बहुजननामा ऑनलाईन टीम : इतर वेळी शिवसेनेच्या मुखपत्र सामन्यातून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे विरोधकांचा समाचार घेत असतात, त्यासाठी आपल्या एकेकाळच्या मित्र असणाऱ्या भाजपची देखील त्यांनी गय केली नव्हती. भाजप सरकारच्या न पटणाऱ्या निर्णयांवर शिवसेनेने नेहमी टीका केली आहे. मात्र, आज उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुखपत्र असणाऱ्या तरुण भारतमधून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘शिवसैनिक आता पालखीचे भोई बनणार नाही, तर स्वतः पालखीत बसतील, अशी घणाघाती टीका संघाने केली आहे.
‘मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, या वाक्यप्रचाराची प्रचिती करून देणारे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. आज ते कट्टर हिंदुत्वविरोधकांना सोबत घेऊन सत्ता सुंदरी सोबत संसार थाटणार आहेत, ही महाराष्ट्रासाठी शैकांतिका आहे, अश्या शब्दात उद्धव यांच्यावर सडेतोड टीका करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदें असल्याने मुख्यमंत्रीपदी त्यांचीच निवड कार्य हवी होती, मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या नावाला नकार देत उद्धव ठाकरे यांची निवड केली आणि उद्धव ठाकरे देखील पालखीत बसायला तयार झाले, यावरून त्यांची सत्ताकांक्षा लक्षात येते.
हिंदुत्वावरून जहरी टीका :
संघाने शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीकेची झोड उठवली आहे. मधल्या काळात हिंदुत्वाचा चर्चेत मुद्दा होता त्यावेळी, संघाचे हिंदुत्व आणि आमचे हिंदुत्व वेगळे आहे, असे विधान शिवसेनेनं केले होत, त्यामुळे आता त्यातला फरकही जनतेला कळाला आहे. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावेळीही मधू मंगेश कर्णिक यांची एक कादंबरी आली होती, त्यात एक जण नायकाला विचारतो कि, संघाच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात काय फरक आहे ? त्यावेळी तो नायक म्हणतो कि, संघाचं हिंदुत्व हे कातडीसारखं शरीराला घट्ट चिटकलेले आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे अंगावरील शालीसारखं आहे , जे कधीही उतरवून टाकण्यासारखं आहे, काय दूरदृष्टी आहे ना कर्णिक यांची ? त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती याला तंतोतंत लागू होतो.
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला, पण शिवसेनेने अभद्र युती केली. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनी गेली कित्येक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध लढाई दिली बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याने जनतेने त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट ‘ ही उपाधी दिली. मात्र त्यांचा वंशज आज बाळासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसत आहे. राम मंदीराला विरोध करणाऱ्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका संघाने केली आहे.
Visit : bahujannama.com