बारामती : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे. रासप हा भाजपचा (BJP) मित्र पक्ष आहे. तरीही महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
आज (बुधवारी) बारामती येथे एका खासगी कार्यक्रमात महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी जानकर म्हणाले, माझे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार असल्याचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
जानकर म्हणाले, एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं असे सांगत माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे (devendra fadnavis) भांडण सुरू आहे. पण, त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच (NDA) राहणार असल्याचे जानकर म्हणाले. याचबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरूच असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दांत महादेव जानकर यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना टोला लगावला.
दरम्यान, महादेव जानकर यांनी शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मागील काही दिवसांपासून जानकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यातूनच त्यांनी पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
पवार भेटीनंतर जानकर काय म्हणाले ?
आमचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्यासंदर्भात मी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर कारखान्याच्या परवान्याचे कामही झाले आहे. तसेच मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनादेखील कळवले आहे, असे जानकर यांनी म्हटले होते. तसेच या भेटीचा काही लोक वेगळाच अर्थ काढत आहेत. मात्र, असे करणे म्हणजे पराचा कावळा करण्यासारखे आहे. आम्ही एनडीएतच आहोत, असेही जानकर यांनी सांगितले होते.