पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या 8 अवैध धंद्यांवर छापा टाकला आहे. भोसरी, चाकण, निगडी, कुदळवाडी, शिरगाव या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
भोसरी पोलिसांनी तीन लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत आठ आरोपींना अटक केली आहे. भोसरी पोलिसांनी धावडेवस्ती येथील साईरज लॉज, आळंदी रोडवरील सन लॉज अँड म्युझिक अँड डिस्को लाईट हॉल (सूर्या हॉटेल अँड लॉज), शास्त्री चौकातील वनराज हॉटेल बार रेस्टॉरंट व लॉजिंग या तीन लॉजवर कारवाई केली.
चाकण येथे दारूभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी 82 हजार रुपयांची गावठी दारू बनवण्याचे रसायन जप्त केले. या कारवाईत अमृत राठोड (वय 20, रा. फलके वस्ती, मोई) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 8 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या सर्वांना अटक केली असून, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
निगडी पोलिसांनी कल्याण मटका हा ऑनलाइन जुगार चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. निगडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एकूण 15 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी कुदवाळी येथील रवी रंजन वजन काट्याजवळ देशी आणि विदेशी बिअर दारू विकणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 3 हजार 314 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर शिरगाव पोलिसांनीदेखील अशाच प्रकारची कारवाई करत बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे.