Lockdown : उद्योगधंद्याना मिळणार दिलासा ! मुंबई-पुणे वगळता इतरत्र उद्योग सुरू करण्याच्या हालचाली

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव झालेले भाग वगळता इतरत्र किमान 50 टक्के क्षमतेवर कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी औद्योगिक क्षेत्रातून करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई-पुण्यासारखे कोरोनाबाधितांची मोठी संख्या असलेले भाग वगळता इतर भागांत कारखाने सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक भाग वगळून इतर भागात किमान 50 टक्के क्षमतेवर कारखाने सुरू करण्याबाबत विचार होणे अत्यावश्यक आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठीच्या सोयी-सुविधांची काळजी घेऊन कारखाने सुरू करण्याबाबत मागणी केली जात आहे. राज्यात 14 हजार मोठे उद्योग असून 4 लाखांहून अधिक लघू व मध्यम उद्योग आहेत. तर सूक्ष्म उद्योगांची संख्याही मोठी आहे. या उद्योग क्षेत्रावर सुमारे 80 लाख लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार अवलंबून आहे.
संबंधित उद्योगांची महिन्याची उलाढाल जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांच्या आसपास असून त्यातून मोठा महसूल राज्याच्या व केंद्राच्या तिजोरीत जमा होतो. राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 9.9 टक्के तर औद्योगिक क्षेत्राचा वाटा 30.4 टक्के आहे. टाळेबंदीमुळे कृषी-औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठवले आहे, असे महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. औद्योगिक-वाणिज्यिक आस्थापना बंद असल्याने त्यांना वीजबिलात आकारण्यात येणारा स्थिर-मागणी आकार त्या कालावधीसाठी रद्द करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
Comments are closed.