बाराबांकी वृत्तसंस्था – पत्नीला आणायला सासरवाडीला जाणाऱ्या दलित तरुणाला चोर समजून जमावाने मारहाण करत चक्क पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. त्याला आधी झाडाला बांधून मारहाण केली. त्यानंतर त्याला पेटवून दिले. या घटनेत तो ३० टक्के भाजला असून त्याच्यावर लखनऊमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर चौथ्या आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. असं वृत्त एनडीटीव्ही इंडीया या वृत्तवाहिनीने दिले आहे.
सुजीत कुमार असे पिडीत तरुणाचे नाव आहे. सुजीत कुमार गुरुवारी रात्री आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरवाडीला जात होता. त्यावेळी रघुपुरवा गावात कुत्र्यांचा कळपाने त्याचा पाठलाग केला. त्यानंतर तो कुत्र्यांपासून वाचण्यासाठी एका घराजवळ लपला. तेव्हा तेथे स्थानिक रहिवासी श्रवण कुमार, उमेश, राम लखन, आणि दोन जणांनी त्याला घराजवळ लपलेले पाहून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुजीतने त्यांना सांगितले की तो आपल्या पत्नीला आणण्यासाठी जात आहे. तरीही लोकांनी त्याचं काहीएक ऐकून न घेता. चोर असल्याचे सांगून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
कपडे काढून झाडाला बांधून मारहाण
सुजीतला या लोकांनी पकडून त्याचे कपडे काढले. त्यानंतर त्याला झाडाला बांधून मारहाण केली. मारहाणीनंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या गस्ती वाहनाने येऊन त्याची सुटका केली. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यासंदर्भात बारांबकीच्या पोलीस अधिक्षक आकाश तोमर म्हणाले की, याप्रकरणी एससी एसटी अक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. तर लखनऊच्या सरकारी रुग्णालयातील मुख्य चिकित्सा अधिक्षक आशुतोष दुबे यांनी सांगितले की, सुजीतचे पाय गंभीर भाजले आहेत. त्याची स्थिती गंभीर असून त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.