नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डातून एक कोरोनाबाधित रुग्ण पसार झाला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, तब्बल 9 तासांनंतर या रुग्णाचा शोध लागला आहे. या रुग्णाची मानसिक परिस्थिती ठीक नसल्याची माहिती मेडिकल अधीक्षक अविनाश गावंडे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण सकाळी नाष्ट्याच्या वेळेत गायब झाला होता. प्रशासनाला समजल्यानंतर शोध घेतला गेला. मात्र, तब्बल 9 तासांनंतर रुग्ण सापडला. हा कोरोनाबाधित रुग्ण नंतर कोणा-कोणाच्या संपर्कात आला याचा शोध घेतला जात आहे. या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. हा रुग्ण बाहेर जाण्यामागे कोणाचाही दोष नाही. तो इतर रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे-मागे निघून गेला, असेही गावंडे यांनी सांगितले.
11 मार्चला हा रुग्ण या ठिकाणी भरती झाला असून, हिंगणाघाट या ठिकाणचा रहिवासी आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
कोरोनाबाधित मानसिक रुग्ण
सकाळी 7 वाजता हा रुग्ण कोविड वॉर्डातून पसार झाला होता. इतर अन्य रुग्णांच्या नातेवाइकांबरोबर त्यांच्यामागे हा रुग्ण निघून गेल्याची घटना घडली आहे. तब्बल नऊ तासांनंतर या रुग्णाचा पत्ता लागला. या रुग्णाची मानसिक परिस्थिती ठीक नसल्याची माहिती गावंडे यांनी दिली.