पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर आणि पोस्टमन या पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी तक्रार केली आहे.
मागील बऱ्याच महिन्यांपासून सोशल मीडियावर टोकाच्या विद्वेषाची भावना पसरवणे, जातीय तणाव निर्माण करत महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय ऐक्याला तडा जाईल, अशा प्रकारचे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबले असून हा प्रकार कमी होईल असे वाटत होते. पण याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
मात्र महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोकांकडून सातत्याने यू ट्यूबवर (पोस्टमन पोर्टल, थिंक बँक) वर अपलोड केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब आणि गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे निदर्शनास आल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.