नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये दोन न्यायाधीशांनी १४ वर्षाच्या मुलीशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना मुलीला पहिली मासिक पाळी आली असेल तर तिला प्रौढ समजले जाईल, असे म्हटले आहे. हुमा युनुस नावाच्या कॅथोलिक मुलीच्या वडिलांनी हुमाला कराचीतील तिच्या घरातून पळवून नेण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. पण नंतर हुमाने इस्लाम धर्म स्वीकारत मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले.
१४ ऑक्टोबर २०१९ रोजी अपहरणाची घटना झाली होती. त्यानंतर हुमाचे पालक तिला भेटले नाहीत. सिंध उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद इक्बाल कल्हरो आणि इरशाद अली शाह हे खटल्याची सुनावणी करत आहेत. या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीशांनी हुमाची पहिली मासिक पाळी आली तर तिला इस्लामिक शरिया कायद्यानुसार प्रौढ मानून तिचे अब्दुल जब्बार याच्याशी विवाह वैध मानले जाईल. कोणताही दबाव न घेता आणि स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे.
पण दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या टिप्पण्यांमुळे हुमाचे पालक आश्चर्यचकित झाले. हुमाचे वडील युनूस मसीह ‘न्यायाधीशांनी आमच्या पुराव्यांचा विचार केला नाही आणि लग्नाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी शरीयत कायद्याचा हवाला दिल्यामुळे आम्हाला धक्का बसला, असे म्हणाले आहेत. पण उच्च न्यायालयाने अजून अंतिम निर्णय दिला नसून ३ फेब्रुवारीला या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने अधिकाऱ्यांना हुमाचे वय निश्चित करण्यासाठी अधिक मुदत दिली. या खटल्याची पुढील सुनावणी ३ मार्च २०२० रोजी होणार आहे.