नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून त्याच्यामुळे ७२२ लोकांचा मृत्यू झाला असून ३४५४६ जणांना त्याची लागण झाली आहे. शुक्रवारी चीनमध्ये एकाच दिवसात सुमारे ८६ लोकांचा मृत्यू झाला असून हा व्हायरस चीनमध्येच पसरला नसून जगात सुमारे ३० देशातील जवळजवळ १५० लोकांना त्याची लागण झाली आहे. तर संसर्ग होऊ नये म्हणून चीनने दोन राज्यातील लोकांना इतर राज्यांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. तसेच काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली असून १५ सेकंदातच एका व्यक्तीला कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चीनमधील एका ५६ वर्षाच्या व्यक्तीला १५ सेकंदात कोरोना झाला असून फक्त १५ सेकंदासाठी महिलेच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. त्या व्यक्तीला लगेच रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर एकीकडे या व्हायरसच्या सावधानतेबाबत माहिती देत असताना पहिल्या आठ डॉक्टरांपैकी डॉ. ली वेनलिआंग यांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश चीन सरकारने दिले आहेत. त्यासाठी कम्युनिस्ट पक्षाने एक उच्चस्तरीय चौकशी समिती तातडीने वुहान शहरात पाठवली असून एअर इंडिया, इंडिगो आणि इतरही काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी चीनला जाणारी आपली विमाने काही दिवसांसाठी रद्द केली असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच या व्हायरसमुळे भारतीय महिला हॉकी संघाला चीन दौरा रद्द करावा लागला असून आता हॉकी इंडियापुढे ऑलिम्पिकच्या तयारीचे आव्हान आहे. १४ ते २५ मार्च दरम्यान होणार हा दौरा रद्द करावा लागला असून हा दौरा महत्वपूर्ण असल्याचे भारताची कर्णधार राणी रामपाल म्हणाली आहे. तसेच प्रो हॉकी लीगमुळे दौऱ्यासाठी अन्य देश उपलब्ध नसून तयारीसाठी बलाढ्य संघांविरुद्ध खेळणे आवश्यक असल्याने पर्यायाचा शोध सुरू आहे, असेही ती म्हणाली.