उस्मानाबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यास उस्मानाबाद येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. प्रारंभी उपजिल्हाधिकारी रामकृष्ण चोबे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर उस्मानाबादकरांना खळखळून हासविणारे हास्य कविसंमेलन रंगले होते. संमेलनात रामदास फुटाणे, किशोर मुगल, भरत दौंडकर, अनिल दिक्षीत, अरूण पवार, नारायण पुरी, डी. के. शेख, रविंद्र केसकर, इंद्रजित घुले यांनी विविध कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांना हसायला भाग पाडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक भराटे तर नेत्रराग तज्ञ डॉ. मिलिंद पौळ, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दयानंद बिराजदार, साळी ज्वेलर्सचे संजय साळी, महेश पोतदार, प्रशांत कावरे, बाबासाहेब साळुंके, खलिल सय्यद आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे भव्य खुल्या समूह आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांची उपस्थिती राहणार आहे.