पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातून कामशेत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या घरातून सुमारे 86 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीस जेरबंद केले असून दुसरा आरोपी पळून गेला आहे, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संतोष रामचंद्र वाळुंज असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर, धनाजी विठ्ठल जीटे याला कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 578 किलो गांजा जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सराईत मुख्य आरोपी संतोष यांच्या घराच्या खालील बाजूस (तळघर) गांजा लपविण्यासाठी जागा केली होती. तिथे सुमारे 578 किलो गांजा लपवून ठेवला होता. याची माहिती खबर्याकडून लोणावळा सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी विठ्ठल बदडे, स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी पद्माकर घनवट, पृथ्वीराज ताटे तसेच श्वान पथकाने पवनानगर येथे राहत असलेल्या संतोषच्या घरावर छापा टाकला.
यावेळी तेथे सुमारे 578 किलो गांजा आढळला असून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. परंतु, मुख्य आरोपी संतोष हा पळून गेला असून दुसरा त्याचा साथीदार धनाजी याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस करीत आहेत.