मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मुंबईतील गेट वे येथे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान एका तरुणीने ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर दाखवले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत एक विडिओ ट्विट केला होता. फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद करण्याच्या निर्बंधातून मुक्त करा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तर आदित्य ठाकरे यांनी पोस्टर दाखवणाऱ्या मुलीचा उद्देश नेमका काय होता, हे जाणून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोघांच्या वक्तव्यावरून भाजपचे निलेश राणे यांनी टीका केली आहे.
‘Free Kashmir’ चा अर्थ शिवसेनेच्या संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला ‘Free Internet’ वाटला. लोकांना मूर्ख समजता??? सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका. अख्या भारताला Free Kashmir चा अर्थ कळतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 7, 2020
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरद्वारे ‘ फ्री काश्मीरचा अर्थ शिवसेनेच्या संजय राऊत आणि बारक्या आदित्यला फ्री इंटरनेट असा वाटला. लोकांना मूर्ख समजता??? सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका. अख्या भारताला फ्री काश्मीरचा अर्थ कळतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या दोनही नेत्यांवर निशाणा साधला.
तसेच फ्री काश्मीर या पोस्टरद्वारे जर भारतापासून काश्मीरला वेगळे करण्याचा उद्देश असेल, तर ते चुकीचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. नंतर मात्र पोस्टर झळकावणाऱ्या मेहक मिर्झा प्रभूने सोशल मीडियावर एक विडिओ शेअर केला. “लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे मी पण मुबंईत आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे मला एक पोस्टर सापडले, ज्यावर स्वतंत्र काश्मीर लिहिण्यात आले होते. काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल सेवा सुरळीत व्हावी या एकमेव इच्छेखातर मी ते पोस्टर हातात घेतलं. तेथील लोकांना मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं जात आहे.” म्हणून ते पोस्टर हातात घेऊन झळकावल्याचे मेहकने म्हटले.