पुणे : बहुजननामा ऑनलाईन – अवैध्य वाळू उपसा व वाहतूक प्रकरणात मोक्काच्या (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्ह्यात टोळी प्रमुखास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसिकर यांनी जामीन मंजूर केला आहे. हनुमंत मोहन शेळके ( रा.इंदापूर) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या टोळी प्रमुखाचे नाव आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भिगवण-राशीन रस्त्यावर डिकसळ गावच्या चौकातून वाळू वाहतूक करताना डंपर पोलिसांनी पकडले होते. यानंतर डंपर भिगवण पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. मात्र डंपर ठाण्यात न घेता भिगवण रेल्वे रोडने जाणाऱ्या डांबरी रस्त्याने पळवला. तर वाळू मध्येच टाकून आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्यात आरोपीस अटक केली होती. त्यानंतर १६ मार्च २०२० ला आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
न्यायालयीन कोठडीत असताना आरोपी शेळके याने ऍड. मुजावर व ऍड. मालेगावकर यांचेमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. गुन्हा घडला त्यावेळेस आरोपी हा घटनास्थळी उपस्थित नव्हता व अटक आरोपी यांनी संघटितपणे सामाईक उद्देशासाठी एकही गुन्हा केला नसल्याने मोक्का कायदा आरोपीला लागत नसल्याचा युक्तिवाद ऍड. मुजावर व ऍड. मालेगावकर यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शेळके याला जामीन मंजूर केला आहे, असे ऍड. मजहर मुजावर यांनी पोलिसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली.