वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – वर्तमान स्थितीत आणि यापूर्वीही या ना त्या मार्गाने बहुजन समाजाला शिक्षण, नोकरीपासून वंचित ठेवून संविधानातील कलमांची हत्या करण्याचे प्रयत्न केल्या जात आहे. मागास घटकांच्या आरक्षणावर १३ पॉईंट रोस्टरच्या माध्यमातून छुपा हल्ला केला जात आहे. सरळसेवा भरतीत आणि पदोन्नतीमध्ये अद्याप मागासवर्गीयांच्या आरक्षणाची पूर्तता केलेली नसताना १३ पॉईंट रोस्टरच्या माध्यमातून विद्यापीठ, उच्च महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होण्यापासून एससी,एसटी, ओबीसी आदी मागास घटकांना वंचित ठेवणे होय. त्यामुळे मागास घटकांनी चेतना निर्माण करून सजग राहणे गरजेचे असल्याचे मत प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे अध्यक्ष अरुण हर्षबोधी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंनिस, राष्ट्र सेवा दल व अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या संयुक्त विस्द्यमाने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतीप्रित्यर्थ आयोजित अभ्यास वर्गातील ‘१३ पॉईंट रोस्टर म्हणजे काय?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी अरुण चवडे, जिल्हा प्रधान सचिव सारीका डेहनकर यांची उपस्थिती होती. सुनील ढाले यांनी भारत नावाच्या देशात मनुवाद लागू करण्याचे षडयंत्र म्हणजे १३ पॉईंट रोस्टर होय, असे मत व्यक्त करताना मागास घटकांना आरक्षणाची गरज काय? हे शाहू महाराजांच्या कार्यातून सांगितले. प्राचार्य जनार्दन देवतळे यांनी ओबीसी समाजातील जाणकार लोकांनी १३ पॉईंट रोस्टर नीट समजून घेण्याची गरज व्यक्त केली. तर गजेंद्र सुरकार यांनीही अध्यक्षीय मनोगतातून १३ पॉईंट रोस्टरविरोधात सजग राहणे व इतरांनाही सजग करून व्यापक आंदोलनासाठी सज्जराहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले. संचालन विक्की बिजवार तर आभार प्रितेश म्हैसकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता सचिन मेश्राम, भरत कोकावार, सिद्धार्थ नगराळे, सुधाकर मिसाळ, अनिल मुर्डीव, विठ्ठलराव गुल्हाणे, डॉ. मिरगे, प्रकाश जिंदे यांनी सहकार्य केले.