बहुजननामा ऑनलाइन टीम – भारत आणि अमेरिकेकडून पाकिस्तानला इशारा मिळातच, त्याचा मित्र ड्रॅगन चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानच्या समर्थनात त्याचा मित्र चीनचे वक्तव्य आले आहे. चीनने म्हटले आहे की, पाकिस्तानने दशहतवादाविरूद्ध लढण्याचे खुप प्रयत्न केले आहेत, ज्यासाठी त्यांचे कौतूक झाले पाहिजे. आजच भारत आणि अमेरिकेकडून पाकिस्तानला दशहतवादावरून इशारा देण्यात आला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे वक्तव्य केले आहे. चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लिजियन यांनी म्हटले की, दहशतवाद सर्व देशांसाठी आव्हान आहे. पाकिस्तानने दहशतवादाशी लढण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केले आहेत आणि बलिदान सुद्धा दिले आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे प्रयत्न समजून घेतले पाहिजेत आणि त्याचा आदर केला पाहिजे. चीन सर्वप्रकारच्या दशहतवादाविरूद्ध आहे.
भारत आणि अमेरिकेने दिला होता इशारा
अमेरिका आणि भारताने पाकिस्तानसाठी आज एक सामायिक संदेश जारी केला होता. यामध्ये पाकला दहशतवादी गटांविरूद्ध तातडीने कारवाई करण्यास सांगितले होते. यूएस-भारताने संयुक्त वक्तव्यात म्हटले की, पाकिस्तानने दहशतवादी गटांच्याविरूद्ध ताबडतोब अॅक्शन घ्यावी. त्यांच्या नियंत्रण क्षेत्रात कोणीही दहशतवादी कारवाई करण्याच्या हालचाली करत नसल्याची खात्री करावी. अमेरिकेने या बैठकीत दहशतवादाविरूद्ध भारतकडून करण्यात येत असलेल्या कामांचा उल्लेख करून कौतूक केले.
बैठक 9-10 सप्टेंबरला ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारताकडून काऊंटर टेररिझमचे संयुक्त सचिव महावीर सिंघवी आणि अमेरिकन परराष्ट्र विभागाचे नाथन ए सेल्स यांनी काऊंटर टेररिझमसाठी समन्वयावर चर्चा केली.