हैद्राबाद बहुजननामा ऑनलाईन – आंध्र प्रदेश सरकारने यावेळच्या अर्थसंकल्पात सामान्यांवर अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. मात्र त्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरजातीय विवाहासाठी अर्थसंकल्पात तब्बल ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने आज त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी ही घोषणा केली आहे.
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात ४१ हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळेल, त्याची संख्या वाढेल. आंध्र प्रदेशात गेल्या काही महिन्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्या पाऱ्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी गेल्या वर्षी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी चंदन्ना पेल्ली कनुका अशी योजना सुरु केली होती. या योजनेनुसार अनुसुचित जातीच्या मुलाने अनुसुचीत जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यास सरकारकडून ४० हजार रुपयांची मदत जाहीर दिली जात होती. तसेच इतर मागासवर्गीय मुलाने इतर मागासवर्गीय मुलीसोबत लग्न केल्यास सरकारकडून ३० हजार रुपयांची मदत दिली जात होती.