नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या एका फेडरल कोर्टाने न्यायाधीश विकिलिक्स प्रकरणाशी जोडलेल्या माजी सैन्य विश्लेषक चेल्सी मॅनिंगला तात्काळ जामीन देण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकी सैन्यात असताना लिंग परिवर्तन करण्यासाठी ऑपरेशनकरत पुरुषापासून महिला बनलेल्या मॅनिंगने २०१० साली लाखो गोपनीय लष्करी आणि मुत्सद्दी कागदपत्रे विकिलिक्सने लीक केले असताना त्यात इराक आणि अफगाणिस्तान युद्धाशी जोडलेली गोपनीय कागदपत्रे होती. मॅनिंग यांना हे दस्तावेज २००९ मध्ये इराकमध्ये एका अमेरिकी युनिटमध्ये इंटेलिजन्स ऍनालिस्ट म्हणून काम करत असताना मिळाले होते.
अमेरिकन माध्यमांनुसार, न्यायाधीश अँटोनी जे. ट्रेंगा यांनी गुरुवारी आपल्या निकालामध्ये म्हटले आहे की, “ग्रँड ज्युरीसमोर हजर होण्याची गरज नसल्यामुळे मॅनिंगला कोठडीत ठेवण्याचा कोणताही हेतू नाही.” न्यायाधीशांनी मात्र मॅनिंगवर लादलेला २ लाख ५६ हजार डॉलरचा दंड कायम ठेवला आहे. ३२ वर्षीय मॅनिंगने विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन अंसाजे यांच्याविरूद्ध साक्ष देण्यास नकार दिला असून गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मॅनिंगने बुधवारी व्हर्जिनिया अटक केंद्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मिळाली होती ३५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
मॅनिंगला प्रथम २०१० मध्ये अटक केली होती. त्यावेळी हेरगिरी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला ३५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण अध्यक्षांकडून माफी मिळाल्यानंतर मॅनिंगला २०१७ मध्ये जामीन दिला गेला. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या टप्प्यात त्यांची शिक्षा माफ केली होती.