अहमदाबाद : बहुजननामा आनलाईन- २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला जेरीस आणत संपूर्ण देशभर भाजपावर टीकेची झोड उठवत नावारुपाला आलेल्या तीन युवा नेत्यामधील अल्पशे ठाकोर यांचा अखेर भाजपात प्रवेश झाला आहे. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तीन युवा नेत्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवत भाजपाला जेरीस आणले होते.
काँग्रेसचे युवा नेते अल्पेश ठाकोर व धवल सिंह झाला या दोघांनी भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. अल्पेश ठाकोर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. २०१७ च्या अखेरीस झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत या तीन युवा नेत्यांनी भाजपाला जेरीस आणले होते. त्यांच्या झंझावाती प्रचारामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचीही चिंता वाढली होती. त्यांच्या झंझावाती प्रचारामुळे काँग्रेसने जोरदार मूसंडी मारली होती.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच तिकिटावर अल्पेश ठाकोर आमदार झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. अल्पेश ठाकोर हे काँग्रेस मधीलच काही नेत्यांवर नाराज असल्याने ते भाजपात जाणार अशी चर्चा सुरु होती. अल्पेश ठाकोर यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही. त्यांच्याऐवजी जगदीश ठाकोर यांना तिकीट देण्यात आले होते. अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसकडे साबरकांठा लोकसभा जागेची मागणी केली होती, पण त्याकडेही काँग्रेसने दुर्लक्ष केले. अल्पेश ठाकोर यांच्या या प्रवेशाने गुजरात भाजपाला याचा फायदा होणार आहे.