पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. या संसर्गजन्य रोगाने भारतातही घुसखोरी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दारु पिल्यास फायदा होत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकर्यांनी धुव्वादार चर्चा करीत दारु किेती चांगली असल्याचा अभिमान बाळगला. मात्र, यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने खुलासा करीत अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. कोरोनाच्या संसर्गाबाबत अनेक सोशल मीडियावरून मेसेजही येत आहेत. त्यात काही अफवा असतात तर काही जनजागृती करणारे मेसेज असून सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत आहे.
दारु पिल्यामुळे कोरोना व्हायरस होत नाही असे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे. त्यानंतर हा मेसेज सोशल मीडियावर सुसाट व्हायरल झाला आहे. संबंधित मेसेजवर आता जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात खुलासा केला आहे. अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दारू प्यायल्याने कोरोना व्हायरस दूर होतो ही केवळ अफवा आहे. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोरोनाचा संसर्ग एकदा झाला की तुम्ही मद्यपान केले तरीही तो व्हायरस मारला जाऊ शकत नाही.
ही एक काल्पनिक कथा असून कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या अंगावर मद्य शिंपडणे, मद्यपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे. क्लोरीन आणि किटाणूनाशक म्हणून मद्याचा वापर करत असले तरीही ते अशावेळी शरीरासाठी घातक असल्याचे जागतिक आरोग्य संस्थेने नमूद केले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अशी द्रव्य घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ साबणाने हात धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावून फिरा आणि स्वच्छता राखा असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना केले आहे.