पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मुलगा डॉक्टर अन् कोरोनाने वडिलांचे निधन झाले पण यापरिस्थितीत देखील डॉ. अंजुम शेख व डॉ. जावेद शेख यांनी वडिलांच्या स्मरणार्थ पिंपरीमधील ‘सिटी’ हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये रूपांतर करत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. समाजामध्ये त्यांच्या कामामुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी आणखी एक स्तुत्य काम करत रुग्णालयात बाप्पांची स्थापना करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
डॉ. अंजुम शेख या स्त्री रोग तज्ञ तर डॉ. जावेद शेख हे हाडांचे डॉक्टर आहेत. त्यांचे काळेवाडी परिसरात ए. जे. सिटी हॉस्पिटल 30 बेडचे सुसज्ज रुग्णालय आहे. गेल्या 4 वर्षांपासून ते रुग्णालयात बाप्पांची स्थापना करतात. सात दिवसांच्या बाप्पांची विधिवत आरती व महापूजा केली जाते. त्यामुळे रुग्णालयाचे वातावरण हे भक्तिमय होते. सिटी हॉस्पिटलमधील बाप्पा सामाजिक एकता व सर्वधर्म समभावचे प्रतीक असल्याचे डॉ. शेख दाम्पत्य सांगतात.
दरम्यान कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर डॉ. जावेद यांचे वडील व अंजुम यांचे सासरे यांना देखील कोरोनाची लागण झाली. पण त्यांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी खूप त्रास झाला. व्हेंटिलेटर देखील उपलब्ध झाले नाही. त्यांनी नवीन व्हेंटिलेटर घेऊन त्यांच्यावर उपचार केले. पण यश आले नाही. डॉ. जावेद यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर तीनच दिवसांनी त्यांनी सर्व सामान्याला तात्काळ उपचार मिळावे म्हणून सिटी हॉस्पिटल covid सेंटर म्हणून सुरू केले आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर माफक दरात उपचार केले जातात. याबाबत डॉ. अंजुम शेख या सांगतात, आम्हाला आलेला अनुभव भयानक होता. आम्ही डॉक्टर असून, देखील काही अडचणी आल्या. त्यामुळे आम्ही सर्व सामन्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून covid सेंटर सुरू केले आहे. त्या काळात खासगी रुग्णालये भितीपोटी रुग्णांना घेत नसत. पण आम्ही आमचे रुग्णालय सर्वांसाठी उपलब्ध केले. आता आमच्याकडे 25 हुन अधिक रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार करत आहोत. सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा कार्य पण आम्ही ते करत आहोत. त्याचा आम्हाला आनंद आहे.