हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झालेल्या धक्काबुकीच्या निषेधार्थ हिंगोली रिपाइं आठवले गटातर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आठवले यांना झेड सुरक्षा द्या अशी मागणीही करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अंबरनाथ मधिल एक कार्यक्रम संपवून स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांच्या दिशेने एक तरूण धावत गेला आणि त्याने रामदास आठवलेंना धक्काबुक्की केली. दरम्यान धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र रामदास आठवले यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ हिंगोली रिपाइं आठवले गटातर्फे हिंगोली रेल्वे स्टेशन वर रेल रोको करण्यात आला. दरम्यान उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना रेल्वे समोरून बाजूला केले. त्यानंतर हिंगोली रिपाइं आठवले गटातर्फे रेल्वे अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यातआले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, इतकेच नव्हे तर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, याचबरोबर स्थानिक अंबरनाथ पोलिसांनी बंदोबस्तात दिरंगाई केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, इतकेच नव्हे तर रामदास आठवले ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यावर असतात त्या त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने द्यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी, दिवाकर माने, वसंत मुळे, सुरेश वाढे, मिलिंद कवाने,सुनील इंगोले,काळुराम मोरे, शिवाजी पाईकराव, रामकिसन घोडके, आदी हिंगोली रिपाइं आठवले गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.