नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भाने सामाजिक न्यायमंत्री यांनी ओकललेल्या गरळीचा व पोलीस उपअधिक्षक भाग्यश्री नवटक्के या महिला पोलीस अधिकार्यांच्या जातीय द्वेषाचा भारिप बहुजन महासंघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा बिनबुडाचा आरोप करून राज्यातील व देशातील तमाम दलित वंचित अल्पसंख्याक व आदिवासी समाजाच्या भावनाला हात घातला आहे. देशात वंचिताच्या न्याय हक्कासाठी लढणार्या ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेला आरोप केवळ राजकीय द्वेषातून केला असून ऍड. बाळासाहेब आंबेडकर हे देशातील पिडीत घटकांच्या न्याय व हक्कासाठी संवैधानिक मार्गाने लढा देत आले आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे समाजात संतापाचे वातावरण आहे. त्याच बरोबर पोलीस उपअधिक्षक भाग्यश्री नवटक्के ह्या पोलीस प्रशासनातील उच्च पदावर असणार्या महिला अधिकार्याचे जातीवादाच्या नव्यासंकल्पाना जन्म दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अशा अधिकार्यांकडून जातीयद्वेष पाळला जातो त्यामुळे या अधिकार्यावर कठोर कारवाई व्हावी, भाग्यश्री नवटक्के यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर ऍट्रासिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे व सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर मानहानीचे व समाजात अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. त्याच बरोबर नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील आदिवासी मुलीच्या बलात्कार प्रकरणात वेळेवर चार्जसिट दाखल न करणार्या पोलीस उपअधिक्षक यांची भुमिका ही आरोपींना वाचविण्याची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्या अधिकार्याचे चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न धुरे, महासचिव शाम कांबळे, सय्यद इलियास राजुरकर, संघटक दिपक कसबे, रामचंद्र सातव, महासचिव बाळासाहेब सोनकांबळे, संतोश आगबोटे, उपाध्यक्ष के. एच. वन्ने, के. एच. हसनाळकर, भिमराव बेंद्रीकर, टोपाजी काकडे, आय. टी. विभागाचे रवी चित्ते यांच्यासह विठ्ठल गायकवाड, साहेबराव पंडीत, कनिष्क सोनसळे, सिद्धाथ काळे, विजय सरपाटे, विद्यानंद पवळे, शामराव नौबतकर आदीच्या स्वाक्षर्या आहेत.