मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी आक्रमक होऊन सरकारला विळखा घालत विविध आंदोलनांची घोषणा केली आहे. आज २ नोव्हेंबर पासून आझाद मैदान येथे हाताला काळा कपडा तसेच काळे झेंडे दाखवून बेमुदत उपोषणाला सुरवात होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्रही बंद ठेवण्यात आले होते. या बंद दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या काही तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा क्रांती मोर्चाने १५ नोव्हेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत हे गुन्हे मागे न घेतल्यास १५ नोव्हेंबरनंतर आदोलनाचे स्वरूप तीव्र होईल, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रा. संभाजी पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी दिले आहेत.
इतकेच नव्हे तर मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरची मुदत मागितली होती. त्यामुळे आरक्षण प्रश्नावर १५ नोव्हेंबरनंतरच आंदोलनाला सुरुवात होईल. मात्र आरक्षणप्रश्नी पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान ज्या मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यासह सारथी संस्थेचा कारभार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह यांसह विविध मागण्यांवर अद्याप अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडून यासंदर्भात मराठा समाजाची दिशाभूल होत आहे. छत्रपती संभाजी राजे यांना खासदारकी, नरेंद्र पाटील यांना महामंडळ आणि सदानंद मोरे यांना सारथी संस्थेचे लाभाचे पद देऊन सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रलोभनांचा समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट दिवाळीनंतर आंदोलन अधिक आक्रमक होईल. असेही ते म्हंटले आहे.
विशेष म्हणजे “मराठा क्रांती मोर्चा” नावाने पक्ष स्थापना करणाऱ्यांना पाठिंबा नसल्याचेही स्पष्टीकरण आज सकल मराठा क्रांती मोर्चाने दिले आहेत. मराठा क्रांती मोर्चाची स्थापना मराठा भगिनीवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि मराठा आरक्षणासाठी झाली आहे. तो उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारवर दबावतंत्र म्हणून समाज एकवटला आहे. त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ शकत नाही. परिणामी, अशा कोणत्याही पक्षाला समाज पाठिंबा देणार नसल्याचेही मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.