मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्यासची हाक देण्यात आली आहे. यादरम्यान हाताला काळा कपडा, तसेच काळे झेंडे दाखवून सकल मराठा समाजातर्फे भाजपा सरकारचा निषेध केल्या जाणार आहे.
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते . दरम्यान महाराष्ट्रही बंद ठेवण्यात आले होते. या बंद दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या काही तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा क्रांती मोर्चाने १५ नोव्हेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. परंतु याशिवाय सारथी संस्था, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह व अन्य महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी यासंदर्भात सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची हाक दिली आहे असे समन्वयक निशांत सकपाळ यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे यावेळी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.
इतकेच नव्हे तर मराठा क्रांती मोर्चा समितीने दिवाळीला पाडव्याच्या मुहूर्तावर ‘मराठा क्रांती मोर्चा’ नावाने राजकीय पक्ष स्थापन कारण्याचा विचार करण्यात आला होता, मात्र सकल मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा या दोन्ही समितींकडून विरोध करण्यात आला आहे. तरीही नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या नावे पक्षाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक गुरुवारी दुपारी पार पडली. यादरम्यान मराठा समाजाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबरला रायरेश्वर येथे करणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.