लातूर : बहुजननामा ऑनलाइन – लातूर शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांचा ओढा लातूरकडे आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थिनींची सोय व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत जागेसह सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे प्रतिपादन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
अखिल भारतीय कुणबी मराठा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा येथील औसा रोडवरील दत्त मंदिर परिसरातील कल्पतरु मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी पालकमंत्री निलंगेकर उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार विजेते रामकिशन सुरवसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपायुक्त वैभव सूर्यवंशी उपस्थितीत होते.
संघटनेच्या वतीने यावेळी राज्याचा मराठा समाजभूषण पुरस्कार महापौर सुरेश पवार यांना त्यांच्या प्रतिनिधाला प्रदान करण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर यांना समाजभूषण, चिमाजी बाबर यांना समाजभूषण व संजय धुमाळ यांना जिल्हास्तरीय पुरस्कार, तर पुरुषोत्तम जगताप, गोविंदराव जाधव, संग्राम गायकवाड, भगवान मोरे, प्रल्हाद सूर्यवंशी यांना तालुकास्तरीय पुरस्कार देण्यात आला.