नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाही मास्क का घातला नाही, अशी विचारणा करणार्या पोलिसाला मारहाण केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. त्याने पोलिसाच्या मोटारीची काचही तोडली आहे.
राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातल असून कोरोनावर मात करण्यासाठी जीवाची बाजी लावून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्तृव्य बजावत आहे. पण, तरीही पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना घडतच आहे. लॉकडाउनचे पालन करण्याची समज दिल्याने संतापलेल्या एका तरुणाने चक्क पोलिसावरच हल्ला केला. हवालदाराला मारहाण करून वाहनाची काच फोडली. जुनी शुक्रवारी परिसरात बुधवारी ही घटना घडली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी कार्तिक साहू नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
आरोपी कार्तिकने आपल्या घरासमोरील रस्त्यावर कार पार्क केली होती. मात्र, त्यामुळे अन्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस स्टेशनला या संदर्भात सूचनाही दिली होती. बुधवारी कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले आपल्या सहकार्यांसह गस्तीवर असताना या मार्गावरून जात होते. रस्त्यावरील कार पाहून पोलीस थांबले. पोलीस शिपाई संदीप राऊत यांनी ही कार कुणाची आहे, अशी चौकशी केली. संदीप राऊत यांचा आवाज ऐकून कार्तिक घराबाहेर आला. ’ही कार माझी आहे, तुम्हाला काय करायचे आहे’, असे विचारून वाद घालायला सुरुवात केली. त्याने पोलिसाला तेथून निघून जाण्याचीही सूचना केली.
लॉकडाउन सुरू असतानाही आणि कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाही मास्क का घातला नाही, अशी विचारणा या पोलिसाने केली. त्यामुळे आरोपी कार्तिकने थेट संदीप राऊत यांच्या अंगावर धावून मारहाण करायला लागला. एवढेच नाही तर, त्याने घरातून काठी आणून पोलिसांच्या वाहनांची काच फोडली. हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून कार्तिकला ताब्यात घेतले.
एनपीन्यूज 24 नेटवर्क