बहुजननामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाला मदत जाहीर केली आहे. योगी सरकार पीडिताच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत देणार आहे. ही रक्कम प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देण्यात येईल.
उन्नावचे जिल्हा अधिकारी पीडित कुटूंबाची भेट घेऊन त्यांना धनादेश देतील. या व्यतिरिक्त पीएम आवास योजनेंतर्गत या कुटुंबाला घर देण्याचीही सरकारने घोषणा केली आहे.
गुरुवारी उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यात पीडिता 95 टक्के जळाली होती. यानंतर पीडितेला लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लखनऊमध्ये पीडितेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला दिल्ली येथे नेण्यात आले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. उन्नावची मुलगी वाचू शकली नाही. शुक्रवारी रात्री 11:40 वाजता उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेने प्राण गमावले. दिल्लीत पीडितेच्या निधनानंतर उन्नावपासून लखनऊ आणि दिल्लीपर्यंत मोठा गोंधळ उडाला.
शुक्रवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभेबाहेर प्रतिकात्मक निषेध केला. यावेळी त्यांनी महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत यूपीच्या योगी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. एकीकडे अखिलेश यादव विधानसभेबाहेर धरणे आंदोलन करत होते, दुसरीकडे कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी उन्नाव येथे पोहोचल्या.