औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – वीस वर्षीय महिलेचे सिझेरियन करताना तिच्या पोटात कापसाचा बोळा राहिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार औरंगाबादच्या गंगापूर येथील शासकिय रुग्णालयात समोर आला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तनुश्री तुपे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
तनुश्री यांचं सिझेरियन झाल्यानंतर त्यांना तीन दिवसांनंतर मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर २८ जूलै रोजी त्यांचं निधन झालं. पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा तिच्या पोटात कापसाचा बोळा राहिला असल्याचं समोर आलं. याचा नातेवाईकांना धक्काच बसला. त्यानंतर डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यानेच तनुश्री यांचं निधन झालं. तिला मुलगा झाला होता. परंतु त्याला आपली आई कधीच मिळणार नाही. असा आरोप करत तिच्या कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्यावर पोलीस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.