राजस्थान : येथील उदयपूर भागातील आदिवासी क्षेत्र विकास महामंडळाची एक महिला अधिकारी मागील २ वर्षांपासून चर्चेचा विषय बनली आहे. महामंडळाची वित्तीय सल्लागार भारती राज हिच्या घरी भ्रष्टाचार विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १० कोटींहून अधिक संपत्ती मिळाली आहे. भरती यांच्या ४ बँक खात्यांमध्ये १.०३ कोटी रुपये आणि ३० लाखांचे हिरे मिळाले आहेत तर उदयपूरमध्ये ३ मजली भव्य हॉटेल आणि बिकानेरमध्ये शोरूम असल्याचे आढळून आले.
एसीबी च्या डॉ. आलोक त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारती राज यांच्या विरोधात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि कोर्टातून सर्च वारंट मिळविले गेले. त्यानंतर ७ टीम बनवून एकाच वेळी सर्व ठिकाणी छापा टाकला गेला. त्यांच्या नवरत्न कॉम्प्लेक्स येथील निवास्थानी त्यांच्या संपत्तीची कागदपत्रे सापडली. त्यांमध्ये भुवाणा स्कीम मध्ये एक भूखंड, पीछोला झील येथे हॉटेल, बिकानेर येथे २ शोरूम, आय २० कार, एफ डी , आणि १० लाख ३६ हजार ४३३ रुपये रोख मिळाले.
एसीबी ला येथील कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, आणि एसबीआय या बँकांमध्ये ४ लॉकरदेखील मिळाले. यातील एका लॉकर मधून ३० लाख रुपयांची डायमंड ज्वैलरी देखील हस्तगत केली गेली. घरी मारलेल्या छाप्यांमध्ये ९२ लाख रुपयांची एफडीआर, २ दुकाने, ६ पेक्षा जास्त प्लॉट आणि युपीच्या फतेहपूर येथील जमिनीचे कागद देखील हस्तगत केले गेले.
चौकशीत भारती राज हिने मागील १० वर्षांमध्ये २१ देशांमध्ये स्वखर्चाणे खाजगीरित्या प्रवास केल्याचे समोर आले आहे. या प्रवासामध्ये त्यांनी लाखो रुपये खर्च केल्याची कागदपत्रे देखील मिळाली आहेत. अजूनही एसीबी ची टीम आता भारती राज च्या संपत्तीची चौकशी करत असून अजून संपत्ती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.