नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअॅपवर योगी आदित्यनाथ यांचं घर बॉम्बस्फोट करुन उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आदित्यनाथ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांना आलेल्या या मेसेजमध्ये योगी यांच्या घराबरोबरच इतर पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
लखनौमधील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असून तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे अशी माहिती एका अधिकार्याने दिली आहे. धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथकांच्या मदतीने संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. या परिसरामध्ये योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा आणि इतर काही महत्वाच्या व्यक्तींची घरेही आहेत. या प्रकरणातील दोषी व्यक्तीचा पकडण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात गौतमपल्ली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हलचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकरणा अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मागील महिन्यामध्येही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अशी धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची धमकी देण्याप्रकरणी मुंबईमधील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. सोशल मिडिया डेस्कच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव कमरान आमीन आहे.