बहुजननामा ऑनलाईन – जगातील अनेक देश वाहतुक कोंडीच्या समस्येमुळे त्रासलेले आहेत. शहरीकरण आणि वाढत्या विकासासोबत वाहतुक कोंडीची समस्यादेखील वाढत आहे. या वाहतुक कोंडीतून कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी एका ठिकाणी तर चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. या ठिकाणी राहणारे सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोक रुग्णवाहिकेचा वापर कॅब म्हणून करत आहेत. वैद्यकीय सेवेचा असा दुरुपयोग ईरानची राजधानी तेहरानमध्ये सुरु आहे.
वृत्त संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेहरानची लोकसंख्या एक करोड चाळीस लाख आहे. त्यात शहरातील अनियंत्रित बांधकाम आणि विकासामुळे वाहतुकीची कोंडीचे प्रमाण वाढले आहे. जगातील सर्वात जास्त वाहतुक कोंडीसाठी तेहरानला गणले जाते. वाहतुक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी तेथील श्रीमंतांनी रुग्णवाहिकेलाच कॅब बनविले आहे.
नाझी खाजगी रुग्णवाहिका सेवेचे महमूद रहीमी यांनी याबाबत वृत्तसंसेस्थेला ही माहिती दिली. नुकतेच तेहरानच्या एका फुटबॉलरने नाझी या खाजगी रुग्णवाहिका सेवेला कॉल करून रुग्णवाहिकेची मागणी केली होती. पण आपल्या घरात कोणीही आजारी नसल्याचे त्याने उघडपणे सांगितले होते. त्याला रूग्णवाहिकेचा वापर कॅब म्हणून करावयाचा होता. शिवाय अभिनेते, खेळाडू आणि श्रीमंत लोकही रुग्णवाहिकेचा कॅब म्हणून वापरासाठी अशा प्रकारे कॉल करत असतात. सुरवातील तर फक्त श्रीमंत लोक या सेवेचा दुरुपयोग करत होते. आता मात्र खासगी शिकवणीचे शिक्षकही याचा वापर करु लागलेत. अहवालानुसार, तेहरानच्या पोलीस महानिरीक्षकांनी पोलिसांना रुग्णवाहिकांच्या गैरवापराबाबत चौकशीचे आदेश जारी केले आहेत. आजारी नसलेल्या लोकांना रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांविरूद्धही कारवाई केली जात आहे.