बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या पक्षांतराचा खेळ जोरदार चालू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळचे एकेकाळचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्काच बसला आहे. त्यांच्या या पक्षांतरावर सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. उदयनराजेंना राष्ट्रवादीत असताना जी वागणूक मिळायची ती आता भाजपात आल्यानंतर मिळणार का अशा एक ना अनेक प्रश्न संगळ्यांसमोर आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात उदयनराजेंनी भाजपच्या व्यासपीठावरून पहिल्यांदाच भाषण केले. त्यानंतर त्यांना महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या सभेत काल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर होते. पण याचदरम्यान उदयनराजे भोसले यांना यावेळी वेगळी वागणूक दिली गेल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. तसा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
काय घडलं महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी
काल नाशिकमध्ये महाजनदेश यात्रेचा समारोप झाला.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उदयनराजे भोसले यांनी शिवकालीन पगडी घालून सत्कार केला. उदयनराजे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानंतर आता त्यांचे वंशजही आपल्या सोबत आले आहेत. तर पंतप्रधान मोदींनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत म्हणाले की, शिवकालीन पगडी ही एक जबाबदारी आहे. तर दुसरीकडे त्याचवेळी पंतप्रधान मोदींचा मोठा हार घालून सत्कार करताना मात्र उदयनराजे भोसले स्टेजवरून बाजूला गेल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
या फोटो वरून अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी उदयनराजे यांचा निर्णय चुकला आहे असे बोलले, तर काहींनी ‘पवारसाहेब राजेंना बाजूला बसवायचे, अशी वागणूक देत नव्हते असे काहींचे म्हणणे होते. तर लोकसभेच्या निवडणुकांआधी उदयनराजे यांनी मोदींवर टीका करत ‘आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे, ‘ अशा शब्दात खिल्ली उडवली होती. सध्या हा विडिओ सोशल मीडियावर जोरात चालू आहे. हा संदर्भ पकडून, उदयनराजे आणि पंतप्रधान मोदींचा एकत्र फोटोही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Visit : bahujannama.com