नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा शुक्रवारी घसरण झाल्याचे दिसत आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 170 रुपयांनी घट झाली आहे. या घसरणीमुळे राष्ट्रीय राजधानीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38390 रुपये झाली आहे. सिक्योरिटीनुसार, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्याची घोषणा केल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसत आहे. चांदीच्या भावातही घट झाली आहे. 120 रुपयांनी घट होत चांदीचा भाव 47580 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. गुरुवारीचा चांदीचा भाव 47700 प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.
गुरुवारी सोनं 38560 प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं. एचडीएफसी सिक्योरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, “अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 170 रुपयांनी घसरला. याशिवाय रुपयादेखील आज डॉलरच्या तुलनेत 40 पैशांनी मजबूत राहिला आहे.
जागतिक स्तराबाबत बोलायचं झालं तर, शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये सोनं 1503 डॉलर प्रति औंस होतं. चांदी 17.87 डॉलर प्रति औंस वर होती. बाजाराबद्दल बोलायचं झालं तर, आज सेंसेक्सने 2284.55 अंकाच्या वाढीसह उसळी मारली.