इंदापूर प्रतिनिधी….सुधाकर बोराटे – ग्रामीण जीवनातील दलित पिडितांच्या व्यथा वेदनांना आण्णाभाऊंनी साहित्याचे अक्षरपान दिले. लोकनाट्यातुन लोकशिक्षणाचे धडे देणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे प्रतिभासंपन्न लोकशाहीर असल्याचे मत इतिहासाचे अभ्यासक व इंदापूर महाविद्यालयाचे निवृत्त इतिहास प्रमुख प्रा. विजय रणपिसे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९९ वी जयंती इंदापूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रा. रणपिसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाच्या शिक्षिका अर्चना जगताप या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरेश मिसाळ उपस्थित होते. यावेळी प्रा.रणपिसे म्हणाले की साम्यवादी विचारांच्या प्रचारासाठी अण्णाभाऊ साठे यांनी लोक कलेचा प्रभावी वापर केला. शेतकरी, कामगारवर्गाचे जीवन व त्यांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवुन शब्दांचे सुंदर गोफ विणत, लोकनाट्यातुन लोकशिक्षणाचे धडे देणारे आण्णाभाऊ साठे प्रतिभा संपन्न लोकशाहीर होते.
आण्णाभाऊंच्या वाटेवर दु:ख: दारिद्र्य ,उपेक्षा यांचे काटे पसरले होते.हे काटे दुर करण्यासाठी त्यांनी चिवट झुंज दिली. वयाची बारा वर्षे उलटली तरी त्यांचा अक्षराशी संबंध नसताना रस्त्यावरचे बोर्ड व सिनेमाच्या जाहिरातीतील अक्षरे जुळवित ते बिनभिंतींच्या शाळेत शिकले. या लेखनातुन त्यांच्या मातंग वस्तीतला “फकीरा” त्यांनी शब्द सामर्थ्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविला.स्वकर्तृत्वावर ते रशियाला गेले.त्यातुनच ‘माझा रशियाचा प्रवास’ हा ग्रंथ सिध्द झाला. एक फाटका माणूस आपल्या प्रतिमेच्या जोरावर किती उतुंग झेप घेऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून आण्णा भाऊंच्या जीवनाकडे पाहिले पाहिजे. त्यांनी दलितांच्या वेदनांना वाचा फोडली.
लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, चित्रपट,कथालेखक अशा अनेक भुमिका पार पाडणारे अण्णाभाऊ साठे या कलावंताला शासनाच्या ३५० रुपयांच्या मानधनावर गुजरान करावी लागली.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी बाजारी गाईडचे वाचन करण्याऐवजी संदर्भ ग्रंथांचे वाचन करून आता पासूनच आपल्या देशाचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करावा,असे आवाहनही प्रा. रणपिसे यांनी केले.यावेळी मनोगत गौतमी भोसले यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन भाग्यश्री बागल यांनी केले. स्वागत मनिषा कांबळे यांनी तर आभार सोनाली मारकड यांनी मानले.