भुसावळ बहुजननामा : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे. मुख्यमंत्री पदासाठी मी माझी इच्छा व्यक्त केली असता, माझे काय हाल झाले ? याचा विचार महसूल मंत्री यांनी केला नसावा. तसेच मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल ! असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी हे बोल सुनावले, भुसावळ येथील जी. एस. ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा आढावा घेण्यासाठी एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. तेथे आयोजित प्रत्रकार परिषदेत एकनाथ खडसे बोलत होते. तसेच आमदार संजय सावकारे , डॉ . राजेंद्र फडके आणि इतर मंडळींनी देखील या वेळी हजेरी लावली होती. मात्र एकनाथ खडसे हे जनादेश यात्रेस उपस्थित राहणार नसल्याची चर्चा सुरु आहे. खडसे यांची दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात तारीख असल्याने , त्यांना दिल्लीला जावे लागणार आहे. त्यामुळे जनादेश यात्रेत सहभागी होता येणार नाही असे खडसे यांनी सांगितले.
मुख्यामंत्र्यांनी आपल्याला विधानसभेसाठी क्लीन चिट का दिली नाही ? असा सवाल विचारल्यावर , मी काहीच केले नाही त्यामुळे मला क्लीन चिट ची काय गरज ? असा प्रश्न त्यांनी विचारला . महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. या संदर्भात जेव्हा विचारण्यात आले , तेव्हा माझी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली असता. माझ्यासोबत काय झाले ? याचा अभ्यास त्यांनी केला नाही का ? असा सवाल त्यांनी केला.
विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजप – सेनेची युती टिकून राहील. असेही ते म्हणाले. तसेच भाजप पक्षात होणाऱ्या इनकमिंग बद्दल देखील त्यांनी आपले मत मांडले. भाजप मध्ये अनेक नेते पक्षांतर करत आहे. परंतु त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्त्यांवर अन्याय होत नाही का ? असा सवाल त्यांनी विचारला. आमदार सावकारे यांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यावर कुठलेही आरोप नव्हते , परंतु त्यांच्या वर आता भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना पक्षात स्थान देऊ नये असे मी नाही म्हणणार, पण गडकरींच्या मताशी मी सहमत आहे. तसेच माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभेत नसल्याचा खुलासा देखील त्यांनी केला . कोणीही मला पक्षशिस्त शिकवायची गरज नाही असेही ते म्हणाले.