औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूकांसाठी स्वबळावर मैदानात उतरण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. विदर्भातील उमेदवारीसाठी झालेल्या मुलाखतींनंतर आता मराठवाड्यात चाचपणी सुरु झाली असून २१ जूलैपासून २८ जूलै पर्यंत मराठावाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. तर राज्यातील पहिली उमेदवारांची यादी ३० जूलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेसने अजूनही वंचित बहुजन आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. त्यामुळे कॉंग्रेसला ४० जागा देऊ आणि २४८ जागा आपण लढवू असे वंचितकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर मात्र वंचितकडून स्वबळाची तयारीही सुरु करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीकडून १३ ते १७ जूलै दरम्यान विदर्भातील जिल्ह्यातील मतदारसंघांमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी एकट्या अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघांसाठी तब्बल १२३ जणांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर आता मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम वंचितकडून जाहीर करण्यात आला आहे. वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती पार पडणार आहेत. या मुलाखती २१ ते २८ जूलैदरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पार पडणार आहेत.
२८ जूलै पर्यंत मुलाखती पार पडल्यानंतर वंचितकडून ३० जूलै रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यात पहिली यादी ही विदर्भातील इच्छुकांची असण्याची शक्यता आहे.
कुठे कधी ?
२१ जूलै – उस्मानाबाद
२२ जूलै -बीड
२३ जूलै – लातूर
२४ जूलै – नांदेड
२५ जूलै – हिंगोली
२६ जूलै – परभणी
२७ जूलै – औरंगाबाद
२८ जूलै – जालना