बहुजननामा ऑनलाईन – पोलिसांनी वसईत जप्त केलेला कोट्यवधींचा माल एका पोलीस कॉन्स्टेबलने परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविरुद्ध वालिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.
३१ डिसेंबर २०१८ रोजी वालिव पोलिसांनी विदेशी कंपनीचा सिगारेटचा माल तस्करी करणाऱ्यांकडून कारवाई करत जप्त केला होता. १५० गोण्यांमध्ये हा माल एका टेम्पोमध्ये भरण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा करून टेम्पोसहित जप्त केलेला माल वालिव पोलिस स्टेशनमध्ये आणला. या मालावर निगराणी ठेवणारा मुदैमाल कारकून तसेच सहाय्यक फौजदार शरीफ रमझान शेख यांनी अन्य काही लोकांना सोबत घेत जप्त केलेल्या मालातील १०० गोण्या परस्पर लंपास केल्या. जवळपास हा माल २ कोटी १६ लाख रुपयांचा होता.
या मालाची तस्करी ज्या टेम्पोमध्ये झाली होती त्या टेम्पोचालकाने आपले वाहन परत मिळविण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोर्टाने ११ सप्टेंबर रोजी पोलिसांना टेम्पोमधील १५० गोण्यांतील माल पोलीस ठाण्यात हलवून टेम्पो मालकाला टेम्पो परत देण्याचा आदेश दिला होता. जेव्हा या १५० गोण्या हलवण्यात येत असताना पोलिसांच्या लक्षात आले की पंचनामा वेळी असलेल्या १५० गोण्या आता केवळ ५० च आहेत. यानंतर याबाबत चौकशी केली असता सदर पोलिस कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आणखीन काही कर्मचारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.