लखनऊ : वृत्तसंस्था – योगी सरकारने पोलिसांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पोलिसांसाठी ही बातमी म्हणजे सुखद धक्काच आहे. कारण लवकरच पोलिसांना आता प्रत्येक आठवड्यााला एक हक्काची सुट्टी मिळणार आहे. पोलिसांकडून अनेक दिवसांपासून या सुट्टीसाठी मागणी होत होती. त्यानंतर आता योगी सरकारने पोलिसांना विकली ऑफ दिला आहे. सणासुदीलाही पोलीस कोणतीही सुट्टी न घेता दिवसरात्र काम करतात. त्यांना आता साप्ताहिक सुट्टी देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे.
पोलिसांना अनेकदा महत्त्वाच्या ड्युटी दरम्यान घरी जाता येत नाही. याशिवाय सुट्टी न घेता काम केल्याने पोलिसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतात. पोलीस फिरतीवरील असो किंवा ऑफिसमधील त्यांच्या आरोग्यावर आणि फॅमिलीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे बऱ्याचदा ते त्रासलेले दिसून येतात.
याचा परिणाम नकळत मानसिकतेवरही होताना दिसतो. कारण असे पोलीस अनेकदा वाद किंवा बाचाबाची करताना दिसतात. मानसिक संतुलनावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांना विकली ऑफ देण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयातून त्यांना पोलिसांची काळजी असल्याचंही स्पष्ट जाणवत आहे. नक्कीच सरकारचा हा निर्णय पोलिसांना उपयुक्त सिद्ध होईल असे म्हणता येईल. उत्तप्रदेशात दिवसाढवळया खून, बलात्कार आणि दंगल अशा घटना वारंवार घडतात. तरी देखील उत्तरप्रदेश सरकारनं राज्य पोलिसांनी साप्ताहिक सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी साप्ताहिक सुट्टी मिळू शकते मग महाराष्ट्र पोलिसांना साप्ताहिक सुट्टी का मिळू शकत नाही असा सवाल राज्य पोलिस दलातील काही अधिकारी दबक्या आवाजात करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासुन साप्ताहिक सुट्टी मिळावी अशी मागणी देखील केली जात आहे. मात्र, त्यावर आत्तापर्यंत गांभीर्याने विचार केला जात आहे. साप्ताहिक सुट्टी असते मात्र सण, बंदोबस्त आणि अपातकालीन परिस्थितीत साप्ताहिक सुट्टया रद्द केल्या जातात. वर्षभरातून अनेकदा साप्ताहिक सुट्टया रद्द होतात.