बंगळुरू : वृत्तसंस्था – गुगलवर काही सर्च करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण गुगल सर्च करताना बंगळुरुमधील महिलेकडून झालेली एक चूक चांगलीच महागात पडली आहे. तिला आपला पूर्ण बँक बॅलन्स गमवावा लागला आहे. आजकाल फसवणूक करणारे कोणालाही सोडत नाहीत. त्यांनी आता गुगलाही आपले हत्यार बनवले आहे.
बंगळुरुमधील एका महिलेला झोमॅटोच्या कस्टमर केअरचा नंबर हवा होता. तिने गुगल सर्च केलं. यानंतर त्या नंबरवर कॉल करून रिफंडसाठी रिक्वेस्ट केली. यासाठी तिने आपले बँक अकाऊंट डिटेल्स दिले. यानंतर काही मिनिटातच तिचा पूर्ण बँक बॅलन्स गायब झाला. गुगलवरील तो झोमॅटो कस्टमर केअरचा नंबर हा खोटा नंबर होता. झोमॅटोने या खोट्या कॉल सेंटरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
चेन्नईमधील एक महिलाही नकली कस्टमर केअर नंबरची शिकार होता होता वाचली आहे. महिलेला जेव्हा पासवर्ड विचारला गेला तेव्हा तिला शंका आली आणि तिने चुकीचा पिन नंबर सांगितला. यानंतर तिला मेसेज आला की, पासवर्ड चुकल्यामुळे तुमचे 5000 आणि 10000 रुपयांचे दोन ट्रॅन्जॅक्शन फेल झाले आहेत.
अशा प्रकारची फसवणूक होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. गुगलही अशा प्रकारच्या घटनांमुळे काही बदल करताना दिसत आहे. जर तुम्हाला कधी कसला नंबर हवा असेल तर ऑफिशियल वेबसाईटवरून घेणे गरजेचे आहे अन्यथा फसवणुकीला बळी पडू शकता. याशिवाय बँक अकाऊंटची कोणतीही गोपनीय माहिती कोणाला शेअर करू नका.